May 05, 2011
Strangers, Again…. Lifecycle of Relationship!!
Well Friend Have u heard about Product Life Cycle?... definitely 'yes'... But What About Relation ? Is any relationship follow any kind of cycle? hmmmm... If you like to know then please visit below Link
PS: Copyright WongFuProductions
April 22, 2011
Space
प्रत्येकाला हवं असतं एक आभाळ. स्वत:चं. हक्काचं. स्वत:चे रंग भरण्यासाठी. हवं तेव्हा भरारी मारण्यासाठी. जगापासून पळून कुठे तरी जावंसं वाटलं की मुक्त होण्यासाठी.. पण ते आभाळ हातात येत नाही, हात कितीही पसरले तरी. त्याचा लहानसा तुकडाही नाही मिळत. मग मनातलं आभाळ मनातच हिरमुसतं. घराच्या खिडकीतून डोकावत राहतं. कदाचित थोडंसं खिजवतंही. आभाळ हवंय.. मनात प्रचंड आरडाओरडा सुरू होतो. वाईट वाटत राहतं. मग पडक्या चेहऱ्याने मन, दोन क्षण शांतपणे टेकायला भिंत शोधायला लागतं. पण एक भिंतही मिळत नाही. चकचकीत फर्निचरने सगळ्याच भिंती व्यापलेल्या आहेत. त्या काचेच्या भिंती, आरसे सतत प्रतिबिंब दाखवतात, हिरमुसलेपणाचं. कृत्रिमता अशी घराच्या भिंतींवरून वाहत्येय. कसं बोलणार स्वत:शी? या सगळ्या कृत्रिम वातावरणात स्वत:शी मोकळेपणाने बोलताच येत नाही. फक्त खोटं-खोटं हसता येतं, स्वत:लाच स्वत:बद्दल खोटं काही सांगता येतं.. म्हणूनच स्वत:ची खरी ओळख कळत नाही. स्वत:ला ओळखायला थोडीशी स्वत:ची जागा हवी, जिथे मी माझ्याशी कम्फर्टेबल असेन. स्पेस.
शोधता-शोधता एक कोपरा स्वत:हूनच भिंतींपासून सरकून थोडा पुढे येतो. हाक मारतो. स्वत:चं अस्तित्व दाखवून देतो. ज्या खिडकीतून आभाळाला पकडायचा प्रयत्न केला त्याच खिडकीचा हा कोपरा.. त्याच्यासमोरच्या खुर्चीमुळे दिसलाच नव्हता. हा होईल का माझा हक्काचा कोपरा? इथून आभाळात झेपावता आलं नाही तरी ते दिसत राहील. इथे स्वत:त मांजरीसारखं गुरफटून बसायलाही भरपूर जागा आहे. पर्वाच नको करायला कोणाची.. मी आणि माझं या पलीकडच्या विश्वाला इथे नो एन्ट्री.
अस्फुटसं स्मित. काहीतरी गवसल्याचं..
पाठ त्या भिंतीला घासत-घासत हळूहळू कोपऱ्यात जाऊन फिट् बसलीये. पाय पोटाशी आलेत. स्वत:मध्ये पूर्ण विरघळता आलंय. या विश्वाचे दरवाजे बंद झालेत इतर सगळ्यांसाठी. हेच तर हवं होतं.. किती र्वष वाट पाहिलेली या फीलिंगसाठी. त्यासाठी प्रत्येक सापडलेली संधी अधाशासारखी अनुभवलेली. वाळूत बुडून झालेलं, धबधब्याखाली तासन् तास भिजून झालेलं, कानावर हेडफोन चढवून वेडय़ासारखं एकच गाणं चार-चार तास ऐकून झालेलं, लाडक्या टेडीला घट्ट जवळ घेऊन झोपून पाहिलेलं, ओढणीभर फुलं गोळा करून स्वत:वरच उधळून बघितलेलं.. असं तसं, वेडय़ासारखं, बरंच काही. पण त्यात समाधान नव्हतं. प्रत्येक वेळी अजून काहीतरी हवंसं वाटायचं. त्या काही तरी हवंय आणखी या फीलिंगनंतर येणारी निराशा. हे नाही ते, ते नाही आणखी काहीतरी वेगळंच. कुठेय, कधी मिळणार? शोध, शोध आणि फक्त शोध. न संपणारा.. तो शोध संपलाय बहुधा. आज ते समाधान अशी भिंतीला पाठ टेकल्यावर, जमिनीवर बसल्यावर किती लगेच मिळालं. का कळलं नव्हतं आजवर. इतक्या जवळ असूनही इतकं दूर का वाटत होतं?
खरंच, जमीन जो आपलेपणा देऊ शकते तो इतर वेळी कधीच मिळत नाही. काहीही केलं तरी. तिच्यात उपजतच काही तरी आहे, सगळ्यांना हवं ते देऊ शकणारं. मलाही मिळतंय. पण तरी मानवी हाव संपत नाही. ही जमीन मातीची असती तर.. अधिक रुजता आलं असतं स्वत:तच. असं रुजल्याशिवाय स्वत:ची ओळख पटत नाही.
रुजायला सुरुवात झालीये.
इथे स्वत:चा चेहरा दिसत नाही. त्यामुळे स्वत:बद्दल प्रश्नही पडत नाहीत. आरशात चेहरा दिसला की प्रश्नांची मालिका सुरू होते. स्वत:च्या वागण्याबद्दल कित्ती कित्ती प्रश्न पडतात. पण असे प्रश्न पडणं आवश्यक असतं ना? प्रश्न पडले नाहीत तर स्वत:ची ओळख पटते का? पटते.. न विचारता जेव्हा प्रश्नांची उत्तरं मिळतात तेव्हा स्वत:बद्दलची कोडी सुटतात. कोडी सुटली की निरभ्र होतं मन. अशा एकटय़ाच्या कोपऱ्यातच शक्य होतं असं निरभ्र होणं.
मला या कोपऱ्यात किती छान गाणी ऐकू येतायेत. खूप वर्षांत न ऐकलेली. लहानपणची. झोपताना आई म्हणून दाखवायची ती अंगाईगीतं. बालवाडीत शिकवलेली. स्टेजवरच्या पहिल्या डान्सची. स्वत:च्या पैशातून घेतलेल्या पहिल्या कॅसेटमधली. आजीच्या आठवणीतली. तिच्या पत्रावळ्या झालेल्या वह्यांमधली. कधी अर्थ न समजलेली.
डोळ्यांतून पाणी वाहतंय की आठवणीच आहेत या? कळत नाही. ऊन-ऊन पाणी. जमिनीवर सांडतंय. आता या कोपऱ्यात मोती रुजणारेत. डोळ्यांमधल्या अश्रूंचे, हिरव्या कोवळ्या पानावरच्या पहिल्या-वहिल्या पावसाचे, बोचऱ्या थंडीतल्या पांढऱ्या पाकळीवरच्या दवाचे. हा कोपरा खूप मौल्यवान होणार आहे आता. या हक्काच्या खजिन्याचा शोध घेत जंगलांमधून भिरभिरले तरी ते कुपीत बंद करून घरी आणू शकले नव्हते. पण आज न मागताच, न फिरताच मिळालं. हा खजिना उधळला तरी तो बहरतच जाणार आहे. माझ्या हक्काचा, कधीच रिता न होणारा, कोणाचीच दृष्ट लागू न शकणारा तरी इतरांना हेवा वाटू शकेल असा खजिना. माझ्या कोपऱ्यातला.
पैशाकडे पैसा जातो असं म्हणतात तसं सौंदर्याकडे सौंदर्य, निरभ्रतेकडे निरभ्रता जातो का? होईलही तसं कदाचित. मग या कोपऱ्यात सकाळचं कोवळं ऊनही उतरेल. रात्री कोपऱ्यात बसून गप्पा मारायला चंद्रही येईल. कदाचित त्याच्यासोबत चांदण्याही. त्यांना मात्र परवानगी आहे या विश्वात येण्याची. त्यांच्याच जिवावर तर समृद्ध आहे हे माझं विश्व. कोवळी किरणं, चंद्र, चांदण्या असं सगळंच माझ्या घरात आल्यावर ते आभाळ तरी किती काळ दूर राहील. त्यालाही मोह होईलच की इथे यायचा. मग या माझ्या या कोपऱ्यातच माझं हक्काचं आभाळही असेल.
त्या आभाळाच्या कॅनव्हासवर असतील माझ्या कुंचल्याचे हवे तसे, हव्या त्या रंगांचे फटकारे. देखणे. नितळ. आनंद वाटणारे. जगण्याची नवी ऊर्मी देणारे. मला आणि माझ्या या कोपऱ्यातल्या प्रत्येकाला...
Article By
मृण्मयी
April 02, 2011
एक एप्रिल होता…
खट्टय़ामिठ्ठय़ा दिवसातल्या काही आठवणी कायमच्या कडू बनतात.
त्याच्या बाबतीत असंच झालं.
तो कसा होता?
माणसाने किती साधं असावं! जगावर किती विश्वास ठेवावा? कोणी काहीही म्हटलं तरी अजिबात उलटून बोलू नये. स्वत:च स्वत:ची समजूत घालून स्वत:ला शांत करावं. समंजसपणाची हद्द.. त्याला कधी कधी दोन थपडा लगावून भानावर आणावंसं वाटायचं. त्याला तसं सांगितलं की, तो फक्त मंद मंद हसायचा. म्हणायचा, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नसते. काही गोष्टी सोडून दिल्या की सोप्या होतात..
तो मत्रीलाही फार पक्का होता. मागितला तर जीवसुद्धा द्यायला फार विचार करणार नाही असा. तरीही बिचारा कायम टाग्रेट व्हायचा ग्रुपमध्ये. त्याच्यासाठी वाईट वाटायचं पण त्याचं वागणं एवढं साधं होतं की त्याला टाग्रेट केल्याशिवाय चनच पडायचं नाही. टवाळपणा करणाऱ्यांना पण त्यांचा टवाळपणा चालवून घेणारं कोणी हवं असतं. म्हणून तो. चालवून घेणारा, समजून घेणारा आणि हसून सोडून देणारा.. फारशी मारामारी नसलेल्या िहदी चित्रपटातला साधा-भोळा गाँव का छोरा कसा शोभावा..
पण.. पण हा भूतकाळ होता. त्याचा वर्तमान काही वेगळीच कथा सांगतो.
तो अजूनही उलटून बोलत नाही कोणाला पण आता टाग्रेटही होत नाही. सगळ्यांनाच स्वत:पासून दहा हात लांब ठेवतो. ग्रुपमध्ये असतो तरी नसल्यासारखाच. त्याचं ते मंद मंद हसू पार हरवून गेलंय. त्याची मस्करी करून खो-खो हसायची िहमतच होत नाही आता. खूप काही बिनसलंय..
ते आमचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. मे महिन्यात परीक्षा सुरू होणार होत्या. मार्चमध्ये प्रॅक्टिकल्स संपलेली. आता परीक्षा संपेपर्यंत भेटता येणार नाही याची खात्री होती त्यामुळे प्रॅक्टिकल्स संपल्यानंतर एक दिवस धुमाकूळ घालायचा सगळ्यांनीच जोरदार प्लॅन केला होता. अर्थात सगळा प्लॅन आखण्यात तो आघाडीवर. ३१ मार्चला कट्टय़ावर भेटायचं. खूप सारे फोटो काढायचे. पिक्चर, लंच, पब अशी एक दिवस धमाल करायची आणि मग पुन्हा जोरदार अभ्यासाला लागायचं असं ठरवलं. ठरल्याप्रमाणे धम्माल केलीही आम्ही आणि उरलेल्या पाचशे मार्कासाठी अभ्यासाचा नवा जोष मिळवला. अर्थातच मग टाटा, बाय-बाय झालं आणि तसं टाटा, बाय-बाय करताना पुढचा महिनाभर तरी भेटणार नाही. त्यानंतर वाटा आणखी वेगळ्या होणार या जाणीवेने कसंसंच झालं. रडू आलं. अरे यार, चॅटवर भेटू ना ठरवून सारे अर्धा तास संध्याकाळी, कॉल कर ले ना, तू रो मत यार, युएस में सेम युनिव्हर्सटिी मे अप्लाय करेंगे.. अशी बरीच समजवासमजवी झाली. सेंटी-वेंटी क्षण होते ते. हे सुरू असताना अचानकपणे आमच्या एका मैत्रिणीने जाऊन त्याला सांगितलं की प्लीज उद्या भेट. मला बोलायचंय.
त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. तरी त्याने काहीच न विचारता भेटायचं मान्य केलं.
तो भेटला. ती म्हणाली,‘‘कदाचित मी तुझ्या प्रेमात पडलेय..’’ एवढंच. अवघ्या पाच मिनिटांची भेट. ती निघून गेली आणि कदाचित तोही..
परीक्षा संपली. सगळे पुन्हा भेटले. त्याने ग्रुपसमोर येऊन सांगितलं की तोही तिच्या प्रेमात पडलाय.. त्याचं हे वाक्य ऐकून कोणालाच काहीच बोलायचं सुचत नव्हतं. ‘तो सांगतोय कोणाच्या तरी प्रेमात पडलाय असं????’ धक्का! आणि अचानक सगळे फुटले. खो-खो हसायला लागले. ती तर गडाबडा जमिनीवर लोळायची बाकी होती. आता तो फक्त बघत बसला. त्याला काही सुचत नव्हतं. हसताएत का सगळे?
शेवटी तिनेच कसंबसं हसू थांबवून त्याला सांगितलं की ते एप्रिल फूल होतं..
तो काहीच बोलला नाही. पण त्याच्या डोळ्यांनी खूप काही सांगितलं. त्याने नेहमीसारखंच मंद हसून तो विषय तिथेच संपवला. पण त्याच्या त्या हसण्यात काहीतरी वेगळंच होतं. कदाचित एक जीवघेणी वेदना. डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून चेहऱ्यावर चढवलेला हास्याचा पडदा..
एप्रिल फूल. दीड महिना..
त्या एप्रिल फूलला आमच्या कायम लक्षात राहिल असं काहीतरी करायचं आम्ही साऱ्यांनीच ठरवलं होतं. अर्थात टार्गेट तो सोडून दुसरं कोणीही नसणार हे तर अलिखित सत्य. त्यालाही ठाऊक असलेलं. पण असं काहीतरी.. त्याने कधी विचारच केला नव्हता.
आजही त्याला दिलेली ती वेदना तो समोर असताना आमच्या डोळ्यांत तरळत राहाते. तो नसतानाही ती आम्हाला खुपत राहते. त्याने जेव्हा येऊन आम्हाला सांगितलं की तो तिच्या प्रेमात पडलाय, तेव्हा त्याच्या त्या वाक्यांमध्ये खूप प्रामाणिकपणा होता. निर्भेळ आनंद होता. लहानशा मुलाला वाळुत चमचमता शिंपला सापडावा आणि त्याला जग मुठीत घेतल्यासारखं वाटावं तसं काहीसं त्याच्या चेहऱ्यावर होतं..
तो खरंच तिच्या प्रेमात पडला होता.
विषय संपवताना तो हसतच म्हणाला की एक एप्रिल नसता तर कधीच मी माझ्या स्वत:वर एवढा हसलो नसतो.
त्या वेळी हास्याच्या गदारोळात आम्हाला तो काय बोलला हे कळलं नाही. पण तो अलिप्त होत गेला आणि मग त्याच्या वाक्यांचे आम्ही अर्थ शोधत गेलो. तीही शोधत होती ते अर्थ.. तो पूर्वीसारखा आमच्यातला एक व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण तो तुटतच गेला सगळ्यांपासून.
आणि अशीच काही र्वष उलटल्यावर एक दिवस तिला अचानकपणे जाणवलं की ती सीरिअसली त्याच्या प्रेमात पडली आहे. पण हे त्याला ती कधीच सांगू शकणार नाही.
एप्रिल फूलनंतरचं स्वत:वर हसणं कदाचित जास्त सोपं असतं, स्वत:वर रडण्यापेक्षा.
मृण्मयी...
March 18, 2011
VIVA Vishes
Writing about web page http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=143608:2011-03-17-03-56-07&catid=74:2009-07-28-04-56-38&Itemid=87#JOSC_TOP
राधा.. या दोन अक्षरांमध्ये काय सामावलंय? प्रेम, मैत्री? कदाचित जादू.. प्रेम आणि मैत्री या दोन्ही नात्यांमधली जादू त्या शब्दात सामावली आहे. ती जादूच आहे जी त्याच्यासोबत येणाऱ्या नात्याला एवढं सुंदर बनवते.ती जादूच आहे जी त्या नात्याकडे उठणाऱ्या विखारी नजरेला नितळ बनवते. ती जादूच आहे ज्यामुळे ते सूर साऱ्यांनाच बेधुंद बनवतात. ती जादूच आहे जी जगण्याचं अनोखं बळ देते. तिलाही आणि मलाही. कदाचित मीही अशीच कधी तरी राधा झाले.. हे नातं उलगडून सांगत्येय मृण्मयी..
त्याने स्वत:हून मैत्री केली, वाढवली. मलाही त्याच्याशी मैत्री करायला आवडलं. छान मित्र नक्कीच बनू शकू आपण अशी खात्री झाल्यावर एक दिवस अचानकपणे त्याने इशारा दिला, ‘‘प्रेमात पडू नकोस माझ्या..’’ असं प्रेमात सांगून पडता येतं? असं प्रेमात नको पडूस सांगून प्रेमात पडणं थांबवता येतं? अजबच होतं ते!
‘‘प्रेमात पडली असशील तर आत्ताच सांग, आपण न बोलणंच जास्त बरं..’’ त्याचं पुढचं वाक्य. धोक्याच्या घंटा ठणाणा वाजायला लागलेल्या डोक्यात. याला नेमकं काय सांगायचंय? असं सांगायचं होतं तर मैत्री केली कशाला? अशी असते मैत्री? कित्येक रात्री जागून चार-चार तास गप्पा मारल्यावर ही धमकी? त्या गप्पा मारण्याची सवय झाल्यावर असं निर्दयी वागणं? ‘‘तू प्रेमात पडली असशील तर तुला त्रास होईल. मी त्यातून सहज निघून जाईन.
मला सवय आहे..’’ त्याने हे सांगितलं आणि तासन् तास बोलल्यानंतर तो काही कळलाच नव्हता असं वाटलं तेव्हा.
डोळ्यातलं पाणी डोळ्यातच ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न.. प्रेम म्हणजे काय नेमकं? त्याचे सगळे इशारे, धमक्या, समजावणं यानंतर पडलेला प्रश्न. तासन् तास बोलतो आपण, याला प्रेम म्हणायचं का?
एकमेकांशी गप्पा माराव्याशा वाटतात, याला प्रेम म्हणायचं का? बोलणं नाही झालं, खूप दिवसांमध्ये एकमेकांना भेटलो नाही तर मिस करतो आपण, याला प्रेम म्हणायचं का? चांगलं-वाईट काही झालं की लगेच एकमेकांना सांगावंसं वाटतं, याला प्रेम म्हणायचं का? प्रेम म्हणजे नेमकं काय? आणि या सगळ्याला प्रेम असं म्हणत असतील तर माझी काहीच हरकत नाही, मी तुझ्या प्रेमात पडलेय हे मान्य करायला.. त्याच्या विचित्र धमकीचं एवढंच उत्तर दिलेलं त्या वेळी. त्याच्याशी बोलण्याची एवढी सवय झालेली की त्याच्याशी न बोलणं ही कल्पनाच सहन करण्यापलीकडची होती.
त्यामुळे हे नातं नेमकं काय आहे, कसं आहे याचा विचार न करता तो कायमचा निघून जाऊ नये म्हणून ते सारं सावरण्याची धडपड केली होती. त्याला हसून सांगितलंही की, कधी तुझ्या प्रेमात पडले तर तुलाच येऊन पहिल्यांदा सांगेन.. त्या छानशा संध्याकाळी उगाच दाटून आलेलं मळभ दूर झालं. तू इम्पॉसिबल आहेस, एवढं म्हणून तो हसला आणि मैत्री टिकणार याची खात्री पटली. त्याच्या प्रेमाबिमात पडून धडपडण्यापेक्षा तो दूर जाणार या कल्पनेनं जास्ती त्रास झालेला!
पण अशी एकमेकांबद्दलची खात्री पटली आणि मैत्रीच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना जाणून घ्यायची होणारी धडपड अचानकपणे मंदावली.
कदाचित एकमेकांना खूपसं ओळखून झालेलं. त्यामुळे ती गरज उरली नव्हती. बोलणं, भेटणं कमी झालं. सुरुवातीला रोजच्या रोज बोलणाऱ्या आमचं, दोन-तीन आठवडे झालं तरी बोलणं व्हायचं नाही. तू इतका छान आहेस की तुझ्या आयुष्यात माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी असतील, पण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखे मित्र कमी आहेत.. अशी भयंकर रडारडही करून झाली. तू असा कसा वागू शकतोस? आधी तुझ्याशी काय बोलायचं, असा प्रश्न पडलेल्या मला बोलतं करून आता सवय झाल्यावर असा कसा वागू शकतोस तू? असा प्रश्नही त्याला विचारून झाला. उत्तर न मिळाल्याने प्रचंड घुसमटही झाली. कडाक्याची भांडणं झाली आणि मित्रमैत्रिणींनी ती सोडवली, पण अर्थातच मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातले ते दिवस परत आले नाहीत. अजूनही वाटतं ते दिवस सगळ्यात सुंदर होते.
एकमेकांना ओळखून झाल्यानंतरही तू नक्की प्रेमात पडलेली नाहीस ना माझ्या, असं त्याने वारंवार चाचपडून झालं. माझी मैत्री तुला कळायला अजून काही काळ कदाचित जावा लागेल.. एक दिवस तुला नक्कीच माझी मैत्री कळेल, मला आशा आहे. माझा आशावाद मीसुद्धा त्याच्याकडे व्यक्त केला. तरीही त्याने हा प्रश्न विचारणं थांबवलं नाही. ‘‘मी प्रेमात पडलेय तुझ्या, पण कदाचित तू ज्या अर्थाने विचारतोयस त्या नव्हे. मला वाटलेलं केवळ तुलाच हा अर्थ कळू शकेल, कारण तू इतरांपेक्षा वेगळा विचार करू शकतोस. मला ज्या गोष्टी जगायला आवडतात त्या तुलाही आवडतात, त्या तुला कळतात, म्हणून तुझ्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. मी तुझ्या प्रेमात पडले, कारण मला जे जगायचं होतं ते तू जगतोस, मला जे करायचं होतं ते तू करू शकतोस. माझी स्वप्नं तू प्रत्यक्षात जगतोस. मला माझ्यासोबत चालायला जशी व्यक्ती हवी होती तसा तू आहेस. मी तुझ्याबरोबर कदाचित आयुष्यभर राहू शकेन, पण याचा अर्थ तुझ्याशी लग्न करू शकेन असा नाही.. तू माझा मित्र आहेस, तू माझी मैत्रीण आहेस, तू माझा मोठा भाऊ आहेस, तू माझा मुलगा आहेस, तू माझी डायरी आहेस, तू माझा बाबा आहेस.. आणि अनेकदा तू माझा कोणीच नाहीस. प्रचंड एकटं वाटल्यावर, सारं हरवल्यासारखं वाटल्यावर अगदी तुझ्या कुशीत येऊन लपावंसंही वाटतं. हे सगळंच वाटणं एकीकडे जेवढं निरभ्र आहे तेवढंच दुसरीकडे प्रचंड धूसरही आहे. कारण याच्या मलाच माहीत नसलेल्या छटा कधी समोर येतात माझ्या. म्हणूनच मला मी तुझ्या प्रेमात आहे म्हणजे काय हे आणखी उलगडून सांगता येत नाही.’’ एक दिवस त्याला समोर बसवून, त्याच्याकडे बघून असं सारं सुचेल ते, सुचेल तसं त्याला सांगितलं.
माझे विचार मला त्याच्यासमोर असे थोडय़ाफार सुसंगतपणे का होईना मांडता आले, याचा आनंद झालेला हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा. तो निघून जाईल अशी भीती संपली होती तेव्हा. महिनोंमहिने न बोलल्याने आणि तो न बोलल्याने झालेली सगळी रडारड करून संपल्याने फरक पडणार नव्हता. त्यामुळे हे स्वत:कडे आणि त्याच्याकडेही व्यक्त करायला प्रचंड हिंमत मिळाली होती.
त्याचसोबत, तो बोलला नाही की मला का त्रास होतो. तो निघून जाईल याची मला का भीती वाटते याची उत्तरं त्याच्यासाठी शोधता-शोधता अधिक स्पष्टपणे मला स्वत:लाच कळली होती, त्यामुळे ती आता इतरांना किंबहुना त्याला जरी नाही कळली तरी फरक पडणार नव्हता.. त्याला हे सांगितलं, सांगताना अजिबातच रडू येत नव्हतं आणि सांगितल्यावर तर छानसं हसताही आलं. तोही हसला. आता तर तो आणि मी या नात्याबद्दल इतका विश्वास निर्माण झालाय, त्यातून एवढं काही मिळाल्यासारखं वाटतंय की इतरांनाही असं नातं जगता यावं एकदा तरी, असं वाटतं.
प्रेम म्हणजे नेमकं काय हे मला कोणत्याच कवितेतून कोणत्याच पुस्तकातून, कोणत्याच नात्यामधून, कोणत्याच कलाकृतीमधून आजही मला पूर्णपणे कळलेलं नाही. एखादा कॅलिडोस्कोप फिरवल्यावर प्रत्येक वेळी त्यातल्या काचेच्या रंगीत तुकडय़ांकडे पाहताना येणारी मजा जशी वेगळी असते तसं काहीसं दिसत राहतं ते प्रेम मला. पण प्रेम म्हणजे लग्न नव्हे, प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नव्हे, प्रेम म्हणजे एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची दिलेली वचनं नव्हेत हे त्याच्याशी झालेल्या ओळखीनंतर ठळकपणे जाणवत गेलंय.
तो.. त्याच्या काही गोष्टी मला इतक्या आवडतात की, माझ्या बाळामध्ये त्याचे काही गुण यावेत म्हणून मी त्याच्या आईने त्याला जसं घडवलं तसं माझ्या बाळाला घडवायचा प्रयत्न करणार आहे. तसं मी त्याला सांगितलंही आहे.. आणि त्याला, माझा पुढचा जन्म त्याची मुलगी म्हणून व्हायला हवाय.. वास्तवामध्ये अशा गोष्टींना काही अर्थ नसतो, पण प्रेमामध्ये मात्र कोणत्याच गोष्टींचा अर्थ शोधायचा नसतो. म्हणूनच हे सारं कदाचित उगाच गोड-गोड असलं तरी त्याचं विश्लेषण करावंसं वाटत नाही. ते तसं समोर जगत असल्याने ते खोटं वाटत नाही. कदाचित असं विश्लेषण न केल्यानेच हे प्रेम, हे नातं, ही मैत्री प्रत्यक्ष अनुभवूनही आम्हाला दोघांनाही त्याचं समीकरण अजूनही पूर्णपणे मांडता येत
नाहीये. पण खरं सांगायचं तर ते असं अपुरं राहण्यातच जास्त मजा आहे..
नितळपणा आहे
February 06, 2011
Welcome To New World —MY BLOG
Hi Everyone,
I am Parag. I am pursuing my MSc in Engineering Business Management from WMG. oh After a long time I am doing something different..got very little time from my Busy( i mean to say busy with no work) schedule. Starting this new activity and i hope (Fingers crossed) i am able maintain this reguraly. lets hope for th best. lolz..so my friends if you are visiting my blog and reading this ..so please please need your valuable comment ...wil help to motivate and write something good...so looking forward for your comments
Cheers,
Parag R.